जया जया जी सद्गुरुराजा। विश्वंभरा विश्वबीजा ।1।।

    08-Jun-2026
Total Views |
 
 

saint 
श्रीगणेश आणि शारदा यांच्या प्रार्थनेनंतर श्रीसमर्थ आता सद्गुरुस्तवन या पहिल्या दशकातील चाैथ्या समासात सद्गुरुला वंदन करून त्याच्या कृपेची करुणा भाकत आहेत. अंतरामधील विचार गणेशकृपेने ज्ञात झाला, शारदेच्या कृपेने त्याला शब्दरूप प्राप्त झाले तरी त्याचा विचार परिपूर्ण हाेण्याची वाट दाखविण्यासाठी सद्गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असतेच.अंधाऱ्या रात्री चालताना आपल्याला नेत्रांच्या रूपाने पाहण्याची शक्ती असते, वाट पूर्वी कधीतरी दिवसा पाहिलेली असते, परंतु काळाेखात या दाेन्हीचा काहीच उपयाेग हाेऊ शकत नाही. त्यामुळे मार्ग दाखविण्यासाठी पथप्रदीप म्हणून दिवा लागताेच.
 
अगदी त्याचप्रमाणे प्रपंच काय आणि परमार्थ काय; वाचन काय, निरूपण काय आणि त्याचे लेखन काय सद्गुरूच्या कृपारूपी मार्गदर्शनाशिवाय सिद्धीस जात नाही.अशा या गुरूचे वर्णन करण्यास जेथे शब्दच ताेकडे आहेत तेथे मला अज्ञानाला ते स्वरूप कसे कळेल, अशा कारुण्यपूर्ण प्राथनेने श्रीसमर्थांनी या समासाची सुरुवात केलेली आहे. ज्याचे स्वरूप श्रुतींनाही सम जले नाही, मायेलाही उमगले नाही, त्याचे गुणवर्णन मी कसे करू शकणार? परमात्मा भेटत नाही ताेवर त्याची प्रतिमा कल्पून म्हणजे सगुण रूप कल्पून आपण आपापल्या मनातील भावभक्तीप्रमाणे पूजन करताे तसे श्रीसमर्थ म्हणतात की, मीही मायेचाच आधार घेऊन सद्गुरूचे स्तवन करीत आहे.