मध्य प्रदेशात या स्निफर कुत्र्याने वन्यजीव गुन्हेगारीची 51 प्रकरणे उघडकीस आणली

    08-Jun-2026
Total Views |
 
 
 
MPR
मध्य प्रदेशातील विरांग येथील दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात एक स्निफर कुत्रा शिकाऱ्यांसाठी एक समस्या बनला आहे.गॅलिलिओ नावाच्या बेल्जियन मॅलिनाॅइस जातीच्या कुत्र्याने वन्यजीव गुन्हेगारीची 51 प्रकरणे उघडकीस आणली आहेत आणि 91 हून अधिक शिकारी व लाकूड तस्करांना तुरुंगात टाकले आहे. 17 मार्च 2017 राेजी जन्मलेला गॅलिलिओ 2020 पासून या व्याघ्र प्रकल्पात काम करत आहे. बेल्जियन मॅलिनाॅइस हे बुद्धिमान, उत्साही आणि सामाजिक प्राणी आहेत.गॅलिलिओ जंगलातील दाट पानांखाली लपवलेले सापळेही शाेधू शकताे आणि माणसांना न ओळखता येणारे गंध मैलाे दूरवरूनही ओळखू शकताे. त्याचे प्रशिक्षक प्रीतम अहिरवार सांगतात की, गॅलिलिओ डाेळ्याची पापणी लवते न लवते ताेच आपल्या लक्ष्यापर्यंत पाेहाेचताे.
 
गॅलिलिओ हा मध्य प्रदेश वन विभागाच्या 16 सदस्यीय श्वान पथकातील सर्वात हुशार सदस्य आहे. भाेपाळमधील एक पथक त्याच्या खाण्या-पिण्याचा खर्च ठरवते आणि त्यावर दरमहा सुमारे 50,000 रुपये खर्च करते. त्याचनियमितपणे लसीकरण केले जाते आणि त्याच्यासाठी एक विशेष वाहन आहे. विरांगमधील दुर्गावती अभयारण्य 2023 मध्ये व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आले, ते 2,339 चाैरस किलाेमीटर परिसरात पसरलेले असून 6 दुर्मिळ वाघांचे निवासस्थान आहे. गॅलिलिओच्या उपस्थितीमुळे शिकारी वाघ आणि इतर वन्यजीवांची शिकार करण्यास घाबरतात. ताे वन विभागासाठी एक अनमाेल संपत्ती आहे आणि असे म्हटले जाते की केवळ गॅलिलिओच्या नावामुळे तस्कर थरथर कापतात. वनरक्षकांपेक्षाही शिकारी त्याला जास्त घाबरतात.