मागील आठवड्यात पुण्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रांविरुद्ध कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथक स्थापन करून माेहीम राबवली. 29 मे ते 2 जून या कालावधीत ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात एकूण 313 गुन्हे नाेंद करून 213 आराेपींना अटक करण्यात आली. या कारवायांमध्ये एक काेटी 58 लाख 17 हजार 546 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी निर्मितीचे हाॅटस्पाॅट असलेले दिवा गावखाडी भाग, घेसर, अंजूर, अलीमघर, छाेटी देसाई, माेठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घाेरपे, पालेगाव, सावरणे, वेळू, काेरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारिवली, मामणाेली, जांभुळगाव, नांदपगाव, उत्तन, मुरदागाव, काेपराखाडी, गाेराई खाडी याठिकाणी गुन्हे नाेंद करून हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करण्याची कारवाई केली.
पालघर जिल्ह्यातील मालजीपाडा, वसई, विरार व पालघरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील रावेगाव, बेकरेगाव, जावळीगावामधील हातभट्टी केंद्रेही उद्ध्वस्त करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डाॅ.राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. आपल्या परिसरात काेठेही बनावट मद्य, परराज्यातील मद्य, अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्री हाेत असेल, अथवा मिथेनाॅल, क्लाेरेल हायड्रेटसारख्या पदार्थाची किंवा द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री हाेत असल्यास 18002339999 या टाेल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.तसेच 8422001133 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावरही माहिती पाठवता येईल, असे आवाहन विभागाने केले आहे.