आता वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मासुता ।।1।।

    05-Jun-2026
Total Views |
 

saint 
 
श्री गणेशाला वंदन केल्यानंतर दासबाेधाचा तिसरा समास शारदास्तवनाचा आहे. अंतरात प्रतीत हाेणारा अर्थ गजाननाच्या कृपेने नेणत्याला जाणते करताे; परंतु त्या अर्थाला शब्दरूप देण्याचे कार्य शारदेच्या कृपेशिवाय हाेत नाही.शारदेला वंदन करताना श्रीसमर्थ तिचे वर्णन साक्षात वेदांची जननी, ब्रह्मदेवाची सुकन्या, शब्दसंपत्तीचा मूलाधार, वाणीची जन्मदात्री अशी सकल मायेची महाप्रतापी माता असे करतात.याेगी पुरुषांची समाधी, धारिष्ट्यवान पुरुषांचा पराक्रम, महंताची शांती, परमेश्वराची निजशक्ती, ज्ञानी पुरुषांची विरक्ती, धर्मभक्तांची भक्ती, अंतर्मुख झालेल्या महापुरुषांची आत्मस्थिती आणि मुक्त पुरुषांची मुक्ती ही सर्व या शारदेचीच विविध रूपे आहेत.
 
अशी ही शारदामाता अनेकविध प्रकारे, अनेकविध वेषाने आणि रूपाने तिचा कृपाप्रसाद लाभलेल्या भक्तांच्या शब्दाशब्दामधून प्रगट हाेत असते. मनाम ध्ये उठणारे सद्विचारांचे आणि ब्रह्मचिंतनाचे तरंग प्रगट हाेण्यासाठी त्यांना शब्दरूप देण्यावाचून पर्याय नसताे आणि हे शब्दांची नाना वस्त्रे लेवून आलेले अंतर्विचार प्रगटण्यासाठी शारदेच्याच कृपेने वाणी किंवा लेखणी यांचा आश्रय त्यांना घ्यावा लागताे.आत्मप्रचितीवाचून सद्विचार नाही हे जितके खरे तितकेच विचाराच्या प्रसारासाठी शब्द हवेतच, हेही सत्य आहे आणि या शब्दांना वहनासाठी वाणीला आवश्यक असणारे सामर्थ्य शारदेच्या कृपेवाचून प्राप्त हाेत नाही म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, की विचारांचे भासणारे सर्व कर्तृत्व शारदागुणाचेच आहे.