सर्पदंशावरील संशाेधनासाठी भारत-घाना सहकार्य

    05-Jun-2026
Total Views |
 
 


ghana
 
 
सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आराेग्य संशाेधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशाेधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घानाच्या सेंटर फाॅर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धाेरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक झाली. परळच्या हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दाेन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशाेधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आराेग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेतला.
 
हाफकिनच्या संचालिका डाॅ. सुवर्णा खरात, तसेच संस्थेतील अजित जगताप, मृणाल घाग सावंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भाग घेतला. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री राॅकफेलर निम्बाबाेउरा, कार्यकारी संचालक प्रा.अ‍ॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डाॅ. जाेनास काेफी डाॅनकाेर, फाॅर्माकाॅलाॅजीव टाॅक्सिकाॅलाॅजी विभागाचे प्रमुख डाॅ.स्टीफन अँटवी, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बाेआमा अचेम्पाँग यांचा समावेश हाेता.
 
सर्पदंशामुळे हाेणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या समस्येवर यावेळी सखाेल चर्चा करण्यात आली. आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांत सर्पदंश हा गंभीर प्रश्न बनला असून, त्यावरील स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध उपचारांची गरज अधाेरेखित करण्यात आली. दाेन्ही संस्थांनी वनस्पतिजन्य औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे, झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल माॅडेल्स तयार करणे, संयुक्त संशाेधन प्रकल्प राबवणे, आंतरराष्ट्रीय संशाेधन अनुदानांसाठी प्रस्ताव सादर करणे आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, असे डाॅ. खरात यांनी सांगितले.