भाईंदरच्या समुद्रात मच्छिमारांवर ड्राेनने नजर

    05-Jun-2026
Total Views |
 

drone 
 
मासेमारी बंदी कालावधीत समुद्रात नाैका घेऊन जाऊन मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर सागरी पाेलिसांकडून ड्राेनद्वारे नजर ठेवली जात आहे. यात आढळून येणाऱ्या बाेटींचे फाेटाे आणि चित्रीकरण करून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.समुद्रातील जैवविविधता टिकून राहावी आणि माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी दरवर्षी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मासेमारीवर बंदी घालण्यात येते. त्यामुळे या कालावधीत समुद्रात जाणाऱ्या लहान- माेठ्या नाैकांवर कारवाईचे आदेश स्थानिक सागरी पाेलिसांना देण्यात आले आहेत. उत्तन परिसरात जवळपास 700 मासेमारी नाैका असल्याने येथील मच्छिमारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन विविध उपाययाेजना राबवते.
 
यंदा मासेमारी बंदी कालावधीची काटेकाेर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सागरी पाेलिसांकडून किनारपट्टीवर ड्राेनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून हे ड्राेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ड्राेनद्वारे किनारपट्टीवर वावरणाऱ्या बाेटींचे फाेटाे आणि चित्रीकरण केले जात आहे. या छायाचित्रांची मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार असून, दाेषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.मासेमारी बंदी कालावधीत उत्तनमधील मच्छिमार समुद्रात जात नसल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.मात्र, बंदीपूर्वी पकडून आणलेली मासळी बाेटीवरील बर्फगृहात साठवून ठेवण्यात आली आहे. ही मासळी किनाऱ्यावर आणण्यासाठी किंवा विक्रीसाठी नेणाऱ्या मच्छिमारांचे फाेटाे टिपून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची तक्रार मच्छिमारांनी केली आहे.