राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सर्वच शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याबराेबरच विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करण्यावर भर देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. 2026-27 हे शैक्षणिक वर्ष सुरू हाेताना विद्यार्थ्यांचा प्रवेशाेत्सव साजरा करणे, तसेच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी दर्जेदार गणवेश देण्यावरही त्यांनी भर दिला.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सह, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी या बैठकीस उपस्थित हाेते.
शाळा सुरू हाेण्यापूर्वी परिसर स्वच्छतेचे याेग्य नियाेजन करावे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश दर्जेदार असावेत.बालभारतीमार्फत 80 टक्के पुस्तके शाळांपर्यंत पाेहाेचली असून, उर्वरित पुस्तके शाळा सुरू हाेण्यापूर्वी पाेहाेचतील याची दक्षता घ्यावी, असेही भुसे यांनी सांगितले.जवाहर बालभवनप्रमाणे शाळांमधून कला, अभिनय, संगीत, वक्तृत्व आदी बाबींवर भर देण्यात यावा. शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीबराेबरच माजी विद्यार्थी संघाचे सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांच्या आवारात अंगणवाड्या सुरू कराव्यात. यामुळे पुढे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत हाेईल, असेही त्यांनी सांगितले. शाळांमधून विद्यार्थी सुरक्षा याेजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.