नागपूर मेट्राेच्या विस्ताराला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

    28-Jun-2026
Total Views |
 
 
Metro
 
नागपूर मेट्राे रेल टप्पा-2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहरदरम्यान विस्तारित उन्नत मेट्राे मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जाेडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिवअसीमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत अतिर्नित जाेडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी 1722.40 काेटींचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला हाेता. हा जाेडरस्ता सागरी सेतूपासून वांद्रे किल्याजवळ जाेडला जाणार आहे. या जाेडरस्त्याचे काम एमएसआरडीसीमार्फत हाती घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्राे रेल टप्पा-2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर याउन्नत विस्तारित मेट्राे मार्गिकेस मान्यता देण्यात आली. ही मार्गिका सुमारे 1.40 किमी. असून, त्यावर 1 उन्नत स्थानक असणार आहे. एकूण 310.35 काेटींचा हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्राे रेल काॅर्पाेरेशन लि. (महामेट्राे) मार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.