बहुतेक प्रकरणांमध्ये जाेडीदार एकमेकांबद्दल क्लाेज माईंडेड (संकुचित) मते बाळगून असतात. कुठे दाेघेही आक्रमक असतात, तर कुठे एक आक्रमक आणि दुसरा स्वतःचा बचाव करण्यात गुंतलेला असताे! परिणामी, प्रश्न साेडवण्यासाठी आवश्यक असलेले वैचारिक वातावरण निर्माण करण्यात दाेघेही अपयशी ठरतात.असे काेण असेल जे आयुष्यात उचापत, अशांतता, दुःख यांसारख्या नकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी नाते जाेडेल किंवा टिकवेल? काेणाला असे वाटेल की, - चला, काेणाच्या प्रेमात पडून अफाट दुःख सहन करूया! किंवा - एकटे आहाेत तर मजेत आहाेत, आता अशांतता निर्माण करण्यासाठी काेणासाेबत तरी सहजीवन सुरू करू? तुम्हाला वाटेल की मी हे विचित्र प्रश्न का विचारत आहे. जर एखादा अपवाद किंवा स्व-पीडेची विकृती असेल तर गाेष्ट वेगळी, बाकी असे काेणी असेल का?
अगदी बराेबर! मलाही हेच म्हणायचे आहे की काेणतीही व्यक्ती दुःख सहन करण्यासाठी किंवा दुःखी हाेण्यासाठी नाते जाेडत नाही. काेणत्याही जाेडप्याच्या सहजीवनाचा उद्देश उचापत, त्रास किंवा अशांतता असूच शकत नाही. हाे, सहजीवनातकाही जाेडीदार भावनांच्या वेदनेने इतके असहाय हाेऊन जातात की त्यांना त्या वेदनेतूनही आनंद मिळताे, ज्याला आपण लर्न्ड हेल्पलेसनेस (शिकलेली असहायता) म्हणताे! न पटणारे पण खरे वास्तव्य असे आहे की, काही अपवाद वगळता, नाते किंवा सहजीवनाचा उद्देश थाेड्या किंवा जास्त समस्यांच्या गर्दीत हरवून जाताे. या समस्येवरचा उपाय असा नाही की प्रश्नच निर्माण हाेऊ नयेत. मी अनेकदा सांगितले आहे की, एकत्र राहिल्यास प्रश्न निर्माण हाेणारच, आणि त्यावरील संयुक्त उपायशाेधणे हाच त्यावरचा मार्ग आहे.
बहुतेक जाेडपी सहजीवनातील प्रश्नांवर संयुक्त उपाय शाेधण्यात अपयशी ठरतात, याची दाेन मुख्य कारणे आपण गेल्या आठवड्यात पाहिली हाेतीकुठे वैयक्तिक प्रश्न साेडवण्यासाठी आवश्यक काैशल्यांचा अभाव असताे, तर कुठे इच्छाशक्तीच शिल्लक नसते! संवाद काैशल्ये आणि स्त्री-पुरुषांची वैशिष्ट्ये समजून घेण्यातील अभावावर आपण चर्चा केली, आता पुढे जाऊया.
जाेडप्यांच्या प्रश्न समजून घेण्याच्या किंवा साेडवण्याच्या काैशल्यात त्यांची विचार करण्याची किंवा मनन करण्याची पद्धत महत्त्वाची भूमिका बजावते. काेणत्याही व्यक्तीसाेबतच्या आपल्या नात्यात, दाेघांच्या एकमेकांबद्दलच्या भावना आणि वागणूकव्यवहार पायाभूत महत्त्व राखतात.
हे दाेन्ही घटक शेवटी आपण त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या नात्याबद्दल काय विचार करताे, यावर अवलंबून असतात.ज्यांच्या राेजच्या जीवनात संघर्ष, वादविवाद हा भाग आहे, अशा एका जाेडप्याचे उदाहरण घेऊ. पती म्हणताे की पत्नीला प्रत्येक गाेष्टीत संशय घेण्याची सवय आहे, म्हणून लहान-लहान गाेष्टीही तिच्यापासून लपवाव्या लागतात, नाहीतर ती उलट-तपासणी करून जगणे नकाेसे करते. पत्नी म्हणते की पतीला छुप्या गाेष्टी करण्याची सवय आहे, जाेपर्यंत वारंवार फिरवून विचारत नाही, ताेपर्यंत ताे काही सांगत नाही आणि विचारले की म्हणताे की तू संशय घेतेस! सहजीवनातील एका ओळीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमागे महा-निबंधाएवढी पार्श्वभूमी असते आणि त्याशिवाय काहीही बाेलणे म्हणजे स्वतःला मूर्ख ठरवण्यासारखे आहे. अशा प्रकरणांमध्ये दाेष एकमेकांबद्दल मनात बळावलेल्या समजुतींचा आणि विचारांचा असताे.