मिरा-भाईंदर शहरातील गृहसंकुलांमध्ये स्मार्ट पाणी मीटर बसवण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. या संदर्भातील ठराव सत्ताधारी भाजपने मांडला असून, त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे; तसेच प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिरा- भाईंदरची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून, सध्या शहराची पाण्याची गरज स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून मिळणाऱ्या सुमारे 200 दशलक्ष लिटर पाण्यावर भागवली जात आहे. सध्या उपलब्ध पाणीपुरवठ्याच्या आधारे प्रशासन पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक आखत आहे. मात्र, अनेक गृहनिर्माण संकुलांना अपेक्षेप्रमाणे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक गृहसंकुलांमधील पाणी मीटर खराब झाल्याची बाबही समाेर आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गृहसंकुलांत स्मार्ट पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या महासभेत महापाैर डिंपल मेहता यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला. त्यास लाेकप्रतिनिधींनी बहुमताने मंजुरी दिली. ठराव मंजूर झाल्यानंतर प्रशासनाला स्मार्ट मीटर बसवण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.