एक काळ हाेता की सुट्टीच्या दिवसांत शाॅपिंग माॅल्समधील कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची सतत वर्दळ असायची, फूड काेर्ट्स कुटुंबांनी गजबजलेली असायची आणि विक्रेत्यांची त्या आठवड्यातील सर्वाधिक विक्री याच काळात व्हायची. मात्र, आज अनेक व्यापाऱ्यांच्या मते चित्र बदलले आहे.पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम भारतातील व्यवसायांवरही दिसून येऊ लागला आहे. साेन्याचे वाढते भाव, इंधनाच्या किमतींमधील अनिश्चितता, पुरवठा साखळीबाबतच्या चिंता आणि ग्राहकांचा सावधगिरीने हाेणारा खर्च या गाेष्टींचा परिणाम शाॅपिंग माॅल्स आणि किरकाेळ बाजारपेठांपासून ते लग्नसमारंभाशी संबंधित व्यवसायांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर हाेत आहे.
व्यापारी आणि किरकाेळ विक्रेत्यांसाठी केवळ किमतींचाच प्रश्न नाही, तर ताे विश्वासाचाही आहे. ग्राहक खर्च करत आहेत, पण ते अधिक विचारपूर्वक पावले उचलत आहेत.व्यावसायिकांच्या मते गेल्या काही आठवड्यांत दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या संख्येत जवळपास 20 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. सामान्य व्यवसायाच्या तुलनेत एकूण विक्रीत सुमारे 50 टक्क्यांची घट झाली आहे.विक्रेत्यांची दरराेजची उलाढाल 25 हजारांच्या वर जायची. शनिवार आणि रविवारी तर ती दाेन लाख ते तीन लाखांच्या दरम्यान व्हायची. पण, आता गर्दीही कमी आहे, आणि लाेक पैसेही जपून खर्च करीत आहेत, असे विक्रेते म्हणाले.
बऱ्याचदा तर ग्राहक दुकानात येतात, वस्तू पाहतात, किंमत विचारतात आणि निघून जातात. ते कमी दरातील वस्तू पाहत असतात.
ग्राहकांचा हा बदललेला कल अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेचे सूचक आहे. आर्थिक पातळीवर अनिश्चितता असते तेव्हा लाेकांची मानसिकता केवळ अत्यावश्यक वस्तूंवर खर्च करण्याची आणि अन्य खरेदी थांबवण्याकडेच असताे.त्यात इंधनांच्या वाढत्या किमतींनी भर घातली आहे. इंधनाच्या किमती वाढल्या की संपूर्ण देशभरातील महागाई सार्वत्रिक वाढते.पण, त्या प्रमाणात लाेकांचे उत्पन्न कधीच वाढत नाही. परिणामी लाेकांच्या वास्तविक उत्पन्नात घटच हाेते. त्यामुळे नेहमीच्या गाेष्टींची खरेदी करण्यासाठीसुद्धा लाेकांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत.त्यातच बेराेजगारीच्या वाढत्या प्रमाणाने लाेकांची आर्थिक स्थिती आणखीच बिकट झाली आहे. महागाई वाढते हे लक्षात घेऊन सरकारने इंधनांच्या किमतीचा फेरविचार करावा आणि राेजगार खऱ्या अर्थाने वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी मागणी हाेत आहे.