ठाण्यातील काेपरी नवी मुंबईतील ऐराेलीदरम्यानचा प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवा खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काेपरी-पटनीदरम्यान 1.4 किमीचा खाडीपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे आरेखन आणि बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावल्यास या खाडीपुलामुळे काेपरी ऐराेली, दिघादरम्यानचे प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर येणार असून, प्रवाशांची वाहतूक काेंडीतून सुटकाही हाेणार आहे.मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध रस्ते प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
यात खाडीपूल, उन्नत रस्ते, जाेडरस्ते, उड्डाणपूल, मेट्राे आदी प्रकल्पांचा समावेश आहे. एमएमआरडीए आता ठाणे आनिवी मुंबईदरम्यान आणखी एक खाडीपूल बांधणार आहे.ठाण्यातील काेपरी ते नवी मुंबईतील ऐराेलीदरम्यान हा पूल असणार असून, हा खाडी पूल 1.4 किमीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी 700 काेटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. सध्या काेपरी ते नवी मुंबई प्रवासासाठी कळवा पुलावरून जावे लागते. ठाणे-बेलापूर रस्तेमार्गे दिघा, पटणी, ऐराेली भागात जाता येते. मात्र, यासाठी माेठा वळसा घालावा लागताे. वाहतूक काेंडीत अडकावे लागते. या प्रवासासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. आता हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत हाेणार आहे. काेपरीपटनी खाडीपुलाच्या प्रस्तावाला मार्चमध्ये एमएमआरडीएने अर्थसंकल्पात मान्यता दिली.