मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून राबवलेल्या उपक्रमामुळे कैद्यांचे यशस्वी पुनर्वसन

    27-Jun-2026
Total Views |
 
crime
 
गुन्हेगारीचा रस्ता साेडून कैद्यांनी पुन्हा एकदा समाजाच्या प्रवाहात यावे, भूतकाळ विसरून सन्मानाने जीवन जगावे आणि त्यांच्या कुटुंबालाही स्थैर्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष उपक्रम राबवला जात आहे.यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ साेशल सायन्स संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा उपक्रम सध्या मुंबई, ठाणे, तळाेजा, येरवडा (पुणे), नागपूर आणि नाशिक या प्रमुख कारागृहांत सुरू आहे. भायखळा, कल्याण, लातूर आणि अलिबाग या जिल्हा कारागृहांतही हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम आता दिसू लागले असून, कारागृहातील कैदी नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडत आहेत. शिक्षा पूर्ण करून कारागृहातून बाहेर पडणारा कैदी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा आणि त्याने पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत. कारागृहातील कैद्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी नियमित संवाद साधून दिला जात आहे. तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी आणि स्वयंराेजगार याेजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येत आहे. एकूणच हा प्रयाेग गृह विभागाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरत आहे.