मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकाॅम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चाैकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नाेत्तराच्या तासात सांगितले.विद्यापीठाच्या परीक्षेतील गैरप्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन चाैकशी समितीच्या अहवालानुसार दाेषींवर नियमानुसार प्रशासकीय व शिस्तभंगाची कठाेर कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नेमलेल्या चाैकशी समितीने सखाेल चाैकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार गैरप्रकारात सहभागी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. दाेषी विद्यार्थ्यांवरही कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तसेच संबंधित दाेषी विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्यात आला असून, त्यांना पुढील दाेन विद्यापीठ परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.