केंद्रीय निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखाेल पुनरिक्षण कार्यक्रमाला वेग आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने व्यापक नियाेजन केले आहे. या माेहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
30 जूनपासून घरभेटी सुरू हाेणार असून, मतदारांची घराेघरी जाऊन माहिती तपासली जाणार आहे.
निवडणूक आयाेगाने या विशेष सखाेल पुनरिक्षण माेहिमेसाठी 1 ऑक्टाेबरला अर्हता दिनांक निश्चित केला आहे. त्यानुसार 20 ते 29 जून या कालावधीत प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्य छपाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही पूर्ण करण्यात येणार आहे. या घरभेटीदरम्यान प्रत्येक मतदाराला दाेन प्रतींमध्ये ‘एन्युमरेशन फाॅर्म’ देण्यात येणार आहे. मतदार अथवा कुटुंबप्रमुखाकडून आवश्यक माहिती भरून आणि स्वाक्षरी घेऊन त्यातील एक प्रत बीएलओकडून तत्काळ जमा केली जाणार आहे, तर दुसरी प्रत पाेचपावती म्हणून नागरिकांकडे राहणार आहे.
त्यामुळे मतदार माहितीची खातरजमा करण्याबराेबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह हाेणार आहे.विशेष सखाेल पुनरिक्षण माेहिमेंतर्गत 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नाेंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांची छाननी करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टाेबर या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टाेबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.