त्रिगुणाच्या पलीकडे असलेले आणि अरूप असे जे निरंजन परमतत्त्व आहे ते साधक आपल्या बुद्धी आणि कल्पनेच्या जाेरावर जाणू शकत नाही.निर्गुण आणि निराकार असे परब्रह्म केवळ आपला अंतरात्मा जाणू शकताे; पण ताे मायेच्या विलक्षण लीलांमुळे बंधनात पडलेला असताे. त्याला आपल्या प्रतिभेच्या जाेरावर बंधमुक्त करून कवी माया आणि ब्रह्म यातील संबंध उकलून देऊ शकताे. काव्यानुभावे श्रीमंत असलेले कवीच साधकाला ब्रह्मानंदाचा मार्ग दाखवू शकतात.श्रुतींना जे सांगावयाचे आहे ते गूढ कवीच उलगडून सांगू शकतात. आत्मबाेधाचा मार्ग कवींच्या सहवासाने सुलभ हाेताे आणि म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, की असा आत्मसाक्षात्कार झालेला कवी भेटणे म्हणजेप्रत्यक्ष परमेश्वर भेटल्यासारखाच अलभ्य लाभ आहे.
डाेळ्यामध्ये जे काजळ घातले असता दिव्य दृष्टी प्राप्त हाेऊन अदृश्य वस्तूही दिसू शकतात त्याला अंजन असे म्हणतात. ज्याला आत्माेद्धाराची तळमळ लागली आहे अशा मुमुक्षु साधकाला कवी भेटणे जणू गूढ ब्रह्मज्ञान दाखविणारे अंजन प्राप्त झाल्यासारखे आहे.साधकांचे साधन आणि सिद्धांचे समाधान ही दाेन्ही कवींच्या ठायी एकत्र नांदताना अनुभवास येतात. स्वधर्म, मनावर म्हणजेच मनातील विकारांवर विजय मिळविण्याचा मार्ग आणि आचारातील शुद्धता याचे मार्गदर्शन कवीच करीत असतात. विरागी मनातील वैराग्य, भक्तांचे भूषण, स्वधर्मरक्षण, प्रेम या भावनेतील अंतर्स्थिती, ध्यानस्थिती ही कवित्वाचीच विविध रूपे आहेत. नानाविध साधनांचे मूळ मार्ग कवी दर्शवितात, त्यासाठी काय प्रयत्न करावे हे सांगून त्याची फलप्राप्ती काय हाेईल हेही ते सांगत असतात.