संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तावेज शासनाच्या संग्रहात

    26-Jun-2026
Total Views |
 

MH 
 
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित संकलित केलेला दुर्मिळ ऐतिहासिक दस्तावेज शासनाच्या संग्रहात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या दस्तावेजाचे जतन व संवर्धन सांस्कृतिक कार्य विभाग करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विधिमंडळात निवेदनाद्वारे दिली.एकसंघ मराठीभाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही स्वातंत्र्याेत्तर भारतातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक लाेकचळवळींपैकी एक आहे.या चळवळीचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पाेहाेचावा आणि संशाेधनासाठी महत्त्वाचे संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कदम यांच्याकडे जतन करण्यात आलेल्या दुर्मिळदस्तावेजांचे परीक्षण व मूल्यांकन शासनाच्या समितीने केले.
 
त्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा शासनाच्या संग्रहात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. शेलार यांनी दिली.या संग्रहात संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित सुमारे 150 दुर्मिळ छायाचित्रे, चळवळीतील नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या 35 मुलाखती, तसेच सुमारे 1258 मिनिटांचे ध्वनिचित्रित दस्तावेजीकरण समाविष्ट आहे. हुतात्मा स्मारक उभारणीसंदर्भातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीच्या बैठकींचे इतिवृत्त, पत्रव्यवहार आणि अन्य महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नाेंदींचाही या संग्रहात समावेश आहे. पुराभिलेख संचालनालयामार्फत या दस्तावेजांचे जतन करण्यात येणार असून, संशाेधक, विद्यार्थी आणि नागरिकांना हा महत्त्वपूर्ण स्राेत उपलब्ध हाेणार आहे, असे त्यांनी सांगितले.