स्मार्ट मीटर लावण्यास विराेध करणारे पत्र अदानी कंपनीस वरिष्ठांना न कळवता परस्पर पाठवल्याच्या कारणास्तव महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. महावितरणच्या काेकण प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालकांच्या स्वाक्षरीने निलंबन आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.यापुढे घरगुती ग्राहकाचे वीजमीटर पूर्व संमती पत्र न घेता परस्पर बदलल्यास, यातून हाेणारे वाद, आंदाेलन झाल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील. अशा आशयाचे पत्र सांगळे यांनी अदानी कंपनीस पाठवले हाेते. केंद्रीय विद्युत प्राधिकरण, केंद्रीय राजपत्र, तसेच मुख्य कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार भारतीय वीज कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना दाेषरहित वीजमीटरची जाेडणी देऊन अचूक वापराची नाेंद ठेवणे ही वीज वितरण कंपनीने स्वतःहून अंमलबजावणी करण्याची बाब आहे. मात्र, सांगळे यांनी परस्पर पत्र लिहून बेशिस्त वर्तन केले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.