आगामी कुंभमेळा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधींना एकत्र आणून निर्माल्यव्यवस्थापनासाठी शाश्वत आराखडा तयार करण्यात येणार आहे.कुंभमेळा प्राधिकरण पर्यावरणपूरक हरित कुंभासाठी सूक्ष्म नियाेजनावर भर देत आहे. मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये माेठ्या प्रमाणावर मंदिरे आहेत. देवाला वाहण्यात येणाऱ्या फुलांच्या निर्माल्याची विल्हेवाट कशी लावता येईल, यावर काम सुरू करण्यात आले आहे. मंदिर परिसरात निर्माण हाेणारे निर्माल्य, फुले आणि पूजाविधीनंतर जमहाेणाऱ्या इतर साहित्याचे याेग्य संकलन आणि प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाणार आहे.
मंदिर संस्थानांच्या सहभागातून निर्माल्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे, गाेदावरीचे संवर्धन आणि सिंहस्थापूर्वी कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.मंदिर स्तरावरील निर्माल्य संकलन व्यवस्था, आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांबराेबर समन्वय आदींचे नियाेजन करण्यात येत आहे. निर्माल्य व्यवस्थापनाबराेबरच ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवरही भर दिला जाणार आहे.संकलित निर्माल्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची शक्यता तपासली जाणार असून, या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी राेजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न राहणार आहे. मंदिर संस्थानांचे मार्गदर्शन आणि सहभागातून निर्माल्य व्यवस्थापनाचे प्रभावी आणि अनुकरणीय प्रारूप उभारण्याचा प्रयत्न असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.