आषाढी वारी वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण साेहळा आहे.यंदाच्या वारीत लाखाे भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियाेजन करावे. डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे वारी जगभरात पाेहाेचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत विधानभवनात आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, साेलापूरचे पालकमंत्री जयकुमार गाेरे, आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आराेग्य राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पालखी साेहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित हाेते.वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ हाेणार आहे.वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी माेठ्या प्रमाणावर जर्मन हँगर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवास सुविधा उपलब्ध हाेणार आहेत. पुणे विभागाबाहेरील पालख्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी साेलापूरच्या पालकमंत्र्यांची नाेडल पालकमंत्री व पुणे विभागीय आयुक्तांची नाेडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. डीजेमुक्त वारीसाठी पाेलिसांनी सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पालखी साेहळा प्रमुखांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालखी साेहळा प्रमुखांनी ज्या मागण्या केल्या हाेत्या, त्याप्रमाणे सर्व कामे पूर्ण केली आहेत.महिलांसाठी रात्रीच्या मुक्कामाची विशेष सुरक्षितता घेतली आहे, असे पवार यांनी सांगितले. जयकुमार गाेरे व पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सादरीकरणाद्वारे तयारीची माहिती दिली.