हा आहे दक्षिण काेरियातील नैसर्गिक चमत्कार

    24-Jun-2026
Total Views |
 


sk
 
 
तुम्ही आजपर्यंत जगात अशा अनेक गाेष्टी पाहिल्या असतील, ज्या माणसाला आश्चर्यचकीत करतील. त्या एकतर एखाद्या मंदिराशी निगडित असतील किंवा एखाद्या इमारतीशी संबंधित असतील किंवा एखाद्या अशा जागेविषयी असतील ज्यांना पाहून मनुष्य आश्चर्यचकीत हाेताे.इथे आम्ही बाेलत आहाेत, एका अशा नैसर्गिक घटनेविषयी, जी पाहण्यासाठी लाेकांची गर्दी हाेते. हा नैसर्गिक चमत्कार आहे दक्षिण काेरियातील. इथे वर्षात दाेन वेळा ही नैसर्गिक घटना घडते.दक्षिण काेरियातील सर्वांत माेठी बेटे (द्वीप) जिंडाे आणि अमाेडाेच्या मध्ये समुद्र स्वत: 40 मीटर रुंदीचा रस्ता देताे. दाेन्ही बाजूंना अथांग समुद्र आणि मध्ये काेरडा रस्ता, हे काेणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या घटनेला जिंडाेचा चमत्कार म्हणतात. जिंडाे आणि माेडाे या बेटांच्या मध्ये सुमारे 2.8 किलाेमीटर अंतर आहे. असे वाटते, की समुद्राने दाेन्ही बेटांमधील आपले पाणी मागे ओढले आहे. या दाेन्ही बेटांविषयी अधिक माहिती पाहू.
 
एक तास राहते ही स्थिती
 
असे वाटते, की जसे समुद्राने आपले पाणी दाेन्ही बाजूंनी मागे खेचले आहे. त्यामुळे मध्यभागी काेरडा रस्ता तयार हाेताे. लाेक या रस्त्यात सीफूड एकत्र करतात. बरेच लाेक एका बेटापासून दुसऱ्या बेटापर्यंत चालत जातात.हा रस्ता एक तासा पुरता खुला असताे. त्यानंतर पुन्हा एकदा हा रस्ता पाण्यात बुडताे. एक तासानंतर जर काेणी इथे आले तर त्याच्यासाठी काेरड्या रस्त्याची कल्पना करणेही अवघड हाेते.
 
ही घटना मार्च ते जूनच्या दरम्यान घडते
 
ही घटना घडत असल्याचे अनेक पिढ्यांपासून दिसून येत आहे. आजसुद्धा हजाराे लाेक ही घटना पाहण्यासाठी येत असतात. ही घटना मार्च ते जूनच्या दरम्यान हाेते. तेव्हा सुमारे 1 तासासाठी समुद्राचे पाणी मागे हटते आणि 2.8 किलाेमीटर लांबीचा आणि 40 ते 60 मीटर रुंद रस्ता तयार हाेताे. लाेक या रस्त्यावर चालतात. पण, जर उशिरा सुरुवात केली, तर त्यांना चिखल किंवा गुडघ्यापर्यंत पाण्यातून जावे लागते. कारण ताे रस्ता समुद्रात पुन्हा हळूहळू बुडताे.
 
इथे हाेते नाच-गाणे
 
सन 1975 मध्ये फ्रांसचे राजदूत पियरे लँडी यांनी याची तुलना बायबलमध्ये लिहिलेल्या मुसाशी केली हाेती. त्यानंतर हे जगभरात प्रसिद्ध झाले. या प्रसंगी एक माेठा उत्सव साजरा करतात. त्यामध्ये पारंपरिक नाच, ढाेल-नगारे, गाणी आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेता येताे. लाेक बूट किंवा वाॅटरप्रूफ बूट घालून, हातात झेंडे घेऊन किंंवा हातात हात घालून या रस्त्यावर चालतात. हे केवळ दृश्यच नाही, तर ते लाेक आणि निसर्ग यांच्यातील नाते आणि जुन्या गाेष्टींशी निगडित आहे.
 
स्थानिक गाेष्ट सुद्धा प्रचलित आहे
 
एका गाेष्टीनुसार जिंडाे बेटावर वाघ राहात हाेते. तेथील लाेक भीतीने माेडाे बेटावर गेले. पण, एक बुजूर्ग आजी ब्याेंग मागे राहिल्या. त्यांनी समुद्रातील देवता याेंगवांग यांना प्रार्थना केली. तेव्हा समुद्र बाजूला हटला आणि जमिनीचा रस्ता तयार झाला. त्यामुळे त्या आपल्या कुटुंबाला भेटू शकल्या.तेव्हापासून दरवेळी समुद्र मागे हटताे, लाेक त्यांची आठवण काढत एकत्र हाेतात.वैज्ञानिक कारणाने पाहिले तर हा चमत्कार नाही. तर लाटांचा परिणाम आहे. सूर्य आणि चंद्र यांची गुरुत्त्वाकर्षण श्नती आणि या जागेची विशेष भाैगाेलिक स्थिती यामुळे समुद्राचे पाणी काही काळासाठी मागे खेचले जाते.