महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3000 काेटींची चालनापश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्याेगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घाेषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातील सहकार क्षेत्रासाठी 3000 काेटींच्या दाेन माेठ्या प्रकल्पांची घाेषणा केली. काेल्हापूर जिल्ह्यात 1500 काेटींचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग काे-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1500 काेटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घाेषणा शहा यांनी केली.येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाइल पार्कमध्ये आयाेजित कार्यक्रमात शहा बाेलत हाेते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काेल्हापूरचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च वतंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, काेल्हापूरच्या सहपालक मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. सहकारी साखर कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रियेसाठी काेल्हापूर जिल्ह्यात 1500 काेटींचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात विविध कारखान्यांची बायप्राॅडक्ट्स एकत्र करून त्यापासून सायट्रिक अॅसिड, इथेनाॅल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातील. या प्रकल्पातून मिळणारा सर्व नफा पुन्हा सहभागी साखर कारखान्यांना वितरित केला जाणार असल्याने शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लाभ हाेईल. पुढील तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी सांगितले.
पुण्यातील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग काे-ऑपरेटिव्ह पुन्हा सुरू करण्यासाठी 1500 काेटीची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घाेषणाही त्यांनकेली. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशातील आणि जगभरातील साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचे काम केले जाईल; तसेच डेअरी प्लांट, इथेनाॅल प्लांट, सायट्रिक अॅसिड प्लांट आणि शेण अथवा मळीपासून सीबीजी निर्मिती करणाऱ्या संयंत्रांसाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याची क्षमता या केंद्रात विकसित केली जाईल. या उपक्रमातून मिळणारा आर्थिक लाभही सहकारी क्षेत्राला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराची घाेषणा करण्यात आली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी मनाेगत व्य्नत केले.