अशक्ताने पूजा करू नये असे थाेडेच आहे? असा श्राेत्यांशी संवाद साधत श्रीसमर्थ शेवटी आपण या विवेचनास म्हणजेच दासबाेध सांगण्याला का उद्युक्त झालाे, किंबहुना हे थाेडेसे धाडसाचे कार्य आपण श्राेत्यांच्या आणि परमेश्वराच्या कृपाप्रसादाच्या भरवंशावरच करावयास कसे प्रवृत्त झालाे, हे विविध मनाेज्ञ आणि काव्यात्म उदाहरणांनी स्पष्ट करतात.श्रीसमर्थ म्हणतात की, माझ्याजवळ चातुर्य, पांडित्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, शब्दकळा, अलंकारिक भाषा यापैकी काहीही नाही. असा मी एक वाग्दुर्बळ आहे. पण श्राेतेमंडळी आपण केवळ परमेश्वरस्वरूपच आहात, त्यामुळेच आपले पूजन मी माझ्या कुवतीनुसार करण्याचा प्रयत्न मांडला आहे.
तुमच्या ज्ञानासमाेर मी अल्पमती आहे. पण तुम्ही साैजन्यमूर्ती आहात म्हणून ज्याप्रमाणे सिंह भयानक असला तरी त्याची पिले त्याच्यापाशी निर्भयपणे खेळतात, तसा मीही तुमच्यासमाेर प्रयत्न करीत आहे.प्रयत्न करणाऱ्याचा पाठीराखा जगदीश्वर असताे तसे तुम्ही माझी पाठराखण कराल आणि तुम्ही प्रेमळ सहृदय संतजन असल्यामुळे माझे चुकणार नाही याची चिंता तुमचेच चित्तात राहून तीच मला मार्ग दाखवेल.त्यात काही न्यून राहिले तर ते तुम्ही कृपाळूपणे पूर्ण कराल या खात्रीनेच मी या दैवी कार्यास सिद्ध झालाे आहे, असे सांगून आणि संतसज्जन श्राेते हे सकल विश्वास माता-पित्यांप्रमाणे वंदनीय आहेत, असे सांगून श्रीसमर्थ श्राेतेस्तवन समास पूर्ण करतात.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299