ओशाे - गीता-दर्शन

    24-Jun-2026
Total Views |
 
 

Osho 
 
जीवनाचे हे सत्य, स्वत:चा स्वभाव विसरणाऱ्यालाही लागू आहे.विसरायलाच लागते, तरच आपणास बाेध हाेईल. बाेधाच्या जन्माची ही अनिवार्य प्रक्रिया आहे. विसरण्याची एकच रीत आहे- जर स्वत:ला विसरायचे असेल, तर स्वत:ला वेगळे समजावे लागेल. तेव्हाच विसरू शकाल, नाहीतर कसे विसरू शकाल? म्हणूनच चेतना स्वत:ला शरीरच समजून घेते, भाव समजून घेते, वृत्ती-वासनासमजूनघेते, फक्त आत्मा आहाेत, असे समजून घेत नाही. दुसऱ्याशी तादात्म्य करून घेते. ही विसरण्याची रीत आहे.याेग या विसरण्याच्या रितीच्या विपरीत यात्रा आहे.याेग म्हणजे घराला परतणे आहे- रिटर्निंग हाेम. खूप खूप दूर निघून गेलात तर मग मागे परत चला अशी ही पुनर्यात्रा आहे. निश्चितच जेथून निघाला हाेतात, तेथेच पाेहाेचाल; पण तुम्ही तेच नसाल.
 
कारण जेव्हा तुम्ही निघालात, तेव्हा या जागेचा आपणास काही बाेध नव्हता. आता जेव्हा परताल तेव्हा पुरेपूर ओळखून असाल. जेथून निघाला हाेतात तेथेच पाेहाेचाल. जेथून बाहेर पडला हाेतात तेथूनच प्रभुमंदिरात प्रवेश कराल. पण आता जे प्रभूकडे परताल ते फार वेगळ्या प्रकारचे असेल. हे मधले क्षण विसरून गेला हाेतात. आता प्रभुमीलनाचा जाे आनंद असेल, समाधीची जी बहार असेल, उत्सव असेल, त्या सगळ्याचा अर्थच वेगळा असेल. प्रभुमीलनाची जी घटना घडेल, ती प्राणांमधे अमृत बरसवून जाईल.तेथेच पाेहाेचाल, पण तेच नसाल. मध्ये विस्मरण घडून गेले आणि आता जेव्हा स्मरण येईल तेव्हा ते पांढऱ्या खडूने काळ्या फळ्यावर मारलेल्या रेघांसारखे झक्क उठून दिसेल.पहिल्यांदाच जे लिहिले जाईल, ते उत्तम वाचता येईल. जाे स्वभाव आहे ताे प्रथमच प्रकट हाेईल. जे झाकले गेले हाेते ते प्रथमच उघडले जाईल.