ग्रंथ तुझ्या कृपाकटाक्षाशिवाय सिद्ध हाेऊ शकणार नाही. तस्मात् तुझी कृपा राहावी अशीही विनवणी करतात.तुझ्या कृपेनेच मनातील संशय आणि संभ्रमाची पुटे विरून जातात आणि सर्वभक्षक कळीकाळावरही विजय मिळून ताे काळही तुझ्या भक्तांचा दास बनून राहताे. तुझ्या कृपेचा ओघ येताच कार्यात येणारी संकटे भयभीत हाेऊन देशाेधडीला लागतात, नाश पावतात.म्हणूनच तुझे विघ्नहर हे नाव अगदी यथार्थ आहे. तूच आम्हा अनाथांचे माहेर आहेस आणि म्हणूनच साक्षात हरीहर म्हणजे श्री विष्णू आणि भगवान शंकरही तुला सदैव वंदन करतात. तुला स्मरून कार्य केले असता सर्व आघात, अडथळे आणि उपाधी यांचा नाश हाेऊन कार्य सिद्धीस जाते. असे गणेशाचे स्तवन करून पुढे श्रीसमर्थ त्याच्या मंगल रूपाचे ‘हरूशे निर्भर उद्दित। सुप्रसन्नवदनु। भव्यरूप वितंड। भीममूर्ती महाप्रचंड।।’ असे वर्णन करतात.
ते करताना समर्थांच्यातील भावकवी ‘थबथबा गळती गंडस्थळे। तेथे आली षट्पदकुळे। झुंकारशब्दे।।’ म्हणजे तुझ्या विशाल गंडस्थळावरून वाहणाऱ्या मधुर मदाने लाेभून भुंग्यांच्या झुंडी झंकार करीत त्यावर ेर धरतात असे लिहून जाताे.आणि पुन्हा विद्यांचा अधिपती असलेल्या गणेशाचे श्रीसमर्थ ‘चाैदा विद्यांचा गाेसावी’ असे यथार्थ वर्णन करतात. सकल विद्या प्राप्त असूनही मनाने विरागी असलेल्या श्रीगणेशाचे स्तवन करताना त्याच्याच कृपाप्रसादाने श्रीसमर्थही तल्लीन हाेतात आणि त्यांना या शुभंकर देवतेचे वर्णन किती आणि कसे करू असे हाेऊन जाते. एका परीने गणेशाच्या कृपाप्रसादाने ‘वाग्सुंन्यास वदवावे’ ही समर्थांची प्राथना सफल हाेण्याची प्रसादचिन्हेच स्पष्टपणे प्रगट हाेताना प्रत्ययास येतात.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299