आता वंदू श्राेतेजन। भ्नत ज्ञानी संत सज्जन।।1।।

    19-Jun-2026
Total Views |
saint 
 
सहाव्या समासाचे नावच मुळी श्राेतेजनस्तवन आहे.
 
श्रीगणेश, शारदा, सद्गुरू आणि संतांना वंदन केल्यानंतर या समासात श्रीसमर्थ श्राेत्यांना वंदन करीत आहेत. आपल्या सर्व आचार विचारात राेखठाेक असणाऱ्या समर्थांच्या मनातील लीनता या समासातून प्रगटताना प्रत्ययास येते.
 
ज्ञानी पुरुष स्वत: केव्हाच उद्धरून गेलेले असतात; पण जगाच्या कल्याणासाठी एकांत साेडून लाेकांतात येतात आणि सामान्य जनांनाही उद्धारून जाण्याचा मार्ग दाखवितात. हे मार्गदर्शन करतानाही मुमुक्षु साधकांचा तेजाेभंग करीत नाहीत. उलट त्यांच्यातीलही गुण पाहतात आणि त्यांच्या अंतरात वसणारा परमार्थही जाणतात.
 
त्यामुळेच स्वत:कडे नम्रता घेऊन ते श्राेत्यांनाही वंदन करतात. ज्याच्या मनात स्वत:ची उन्नती व्हावी अशी आस निर्माण झाली आहे असा श्राेता मिळाला, तर सद्गुरूसही आनंद हाेताे आणि जेव्हा असे श्राेते परमार्थातही काही प्रगती केलेले असतील तर मग त्यांच्यासमाेर निरूपण करताना सद्गुरूलाही विशेष आनंद मिळताे. उत्तम गायकाच्या मैफलीत जर समाेर जाणकार आणि गुणग्राहक श्राेते असतील तर त्या मैफलीस काही आगळाच रंग येताे असे आपण बघताेच. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनीही वक्त्यांचे लेखी श्राेत्यांचे महत्त्व किती असते हे सांगताना, ऐकायला जर श्राेते नसतीलच तर वक्त्याला काेण विचारणार असे म्हणून ‘‘वक्ता वक्ता नाेहे। श्राेतेविण।।’’ असा अभिप्राय दिला आहे.
 
म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, की आता मी श्राेत्यांना वंदन करताे. त्या श्राेत्यांमध्ये भ्नत, संत, ज्ञानी असे सज्जन आहेत. सत्प्रवृतीचे सागर, बुद्धीचे आगर, शब्दसंपत्तीचे भांडार, ज्ञानार्थ आणि भावार्थाचे भुकेले, स्वत:ही वक्तृत्वात प्रवीण असलेले, संशयविरहित बुद्धीचे असे हे श्राेते आहेत.