दया याचिकेच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी विनायक दामाेदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली हाेती, असे लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविराेधात दाखल मानहानीच्या खटल्यातील फिर्यादी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले; तसेच माफीपत्रातील भाषा ही केवळ औपचारिक हाेती किंवा ती सावरकरांच्या राजकीय रणनितीचा भाग हाेती, हे सिद्ध करणारा काेणताही तज्ज्ञ अहवाल उपलब्ध नसल्याचेही त्यांनी मान्य केले.पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश अमाेल शिंदे यांच्या न्यायालयात लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविराेधात दाखल मानहानीच्या खटल्यात साेमवारी फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी उलटतपासणी घेतली.
उलटतपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले, की त्यांच्या माताेश्री हिमानी सावरकर यांनी पुणे येथील कसबा व काेथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली हाेती आणि दाेन्ही वेळा त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले हाेते.
तसेच विनायक दामाेदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचिका दिली हाेती, हे त्यांनी मान्य केले.सावरकर यांच्या दया याचिकेतील भाषा नम्रतेची हाेती, हेही त्यांनी स्वीकारले. दया याचिकेतील भाषा ब्रिटिश सरकारप्रति निष्ठा व्य्नत करणारी हाेती, हे त्यांनी मान्य केले नाही; मात्र ती भाषा तत्कालीन शासकीय व कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीनुसार हाेती, असे त्यांनी सांगितले.
दया याचिकेच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली हाेती, हेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले; तसेच माफीपत्रातील भाषा ही केवळ औपचारिक हाेती किंवा ती सावरकरांच्या राजकीय रणनितीचा भाग हाेती, हे सिद्ध करणारा काेणताही तज्ज्ञ अहवाल उपलब्ध नसल्याचेही त्यांनी मान्य केले. विनायक दामाेदर सावरकर यांचा कैदी क्रमांक 32778 हाेता, असेही त्यांनी सांगितले.14 नाेव्हेंबर 1913 राेजी सावरकर यांनी दाेन पानांची दया याचिका सादर केली हाेती आणि त्याचासंपूर्ण मजकूर सरकारी दप्तरी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच प्रत्येक दया याचिकेमध्ये आय बेग टु रिमेन, सर, युवर माेस्ट ओबेंडीयंट सर्वंट, व्ही. डी.सावरकर असा मजकूर लिहून सावरकरांनी त्यावर सही केली असल्याचे मला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच माफीपत्र करणे हे क्रांतिकारकांवर बंधनकारक नव्हते; ते संबंधित कैद्याच्या इच्छेवर व निर्णयावर अवलंबून हाेते, असेही त्यांनी नमूद केले.
उलटतपासादरम्यान शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे शेवटपर्यंत त्यांच्या विचारसरणीवर व तत्त्वांवर ठाम राहिले हाेते, हे बराेबर असल्याचे त्यांनी मान्य केले.मात्र, त्या कारणामुळेच त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय शिक्षा झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विनायक दामाेदर सावरकर यांनी दया याचिका दाखल केल्याचेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले.न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी 1 जुलै 2026 राेजी हाेणार आहे. या खटल्यात अॅड. ज्ञानेश्वरी जाधव, अॅड. सुयाेग गायकवाड, अॅड.आकाश देशमुख, अॅड. सारंग बहिरट व अॅड. कैलास जिरे सहकार्य करीत आहेत.