एका प्रसिद्ध चीनी साेशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मालकीच्या चुटाे नावाच्या कुत्र्याला खूप कठीण काळाला सामाेरे जावे लागले आहे. हा 8 वर्षांचा कुत्रा गेल्या काही वर्षांपासून साेशल मीडियावर स्टार स्टेटस मिळवत हाेता. आतापर्यंत त्याने 15 लाखांहून अधिक फाॅलाेअर्स मिळवले. त्याचा मालक, गुओ हा जिथे कुठे जायचा तिथे या कुत्र्याला साेबत घेऊन जायचा. मात्र, काही काळासाठी ताे जाॅर्जियाला ट्रिपवर गेला हाेता, तेव्हा त्याने चुटाेला आई-वडिलांकडे ठेवले हाेते.आई-वडील कुत्र्याला घेऊन घराबाहेर रस्त्यावरून चालत हाेते, तेव्हा अचानक बाईकवरून एक चाेर आला आणि कुत्र्याला घेऊन गेला. हे कळताच, गुओ जाॅर्जियाहून विमानाने चीनमधील आपल्या घरी परतले. त्यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आणि आपला लाडका कुत्रा परत मिळवण्यासाठी आकाशा-पाताळ एक करून संघर्ष केला. त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये त्याचा कुत्रा घेऊन गेलेल्या दाेन चाेरांचा शाेध घेतला.
त्याने आधी त्यांना धमकावले आणि कुत्रा परत मागितला.जेव्हा चाेरांनी नकार दिला, तेव्हा ताे कुत्र्याच्या बदल्यात माेठी किंमत माेजायलाही तयार झाला. मग अखेर त्या चाेराने ताेंड उघडले आणि सांगितले की, त्याने चुकून त्या कुत्र्याला भटका कुत्रा समजून कुत्र्याचे मांस विकणाऱ्या एका रेस्टाॅरंटला विकले हाेते. चाेराच्या चेहऱ्यावर काेणताही पश्चात्ताप किंवा खेद नव्हता. उलट, त्याने खिन्न झालेल्या गुओला सांगितले की, तुझ्या कुत्र्याचे तुकडे करून काेणाच्यातरी ताटात वाढले गेले आहेत, त्यामुळे आता माझ्यावर ओरडणे थांबव, मी काेणताही कायदा माेडलेला नाही.घरात राजकुमारासारखे राहणारा आणि साेशल मीडियावर स्टार बनलेला ताे कुत्रा, एका सामान्य भटक्या कुत्र्याप्रमाणे फक्त 2300 रुपयांना विकला गेला आणि त्याचे तुकडे करण्यात आले. ही बातमी चीनमध्ये व्हायरल झाली असून, प्राणीप्रेमी स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांवरील हिंसेविराेधात कायदा असावा, अशी त्यांची मागणी आहे.