पाेलीस सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसूत्री अंगीकारत कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संवेदनशील सेवक व्हावे, असे आवाहन पाेलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले.महाराष्ट्र पाेलीस अकादमीत आज सकाळी प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चा दीक्षान्त संचलन साेहळा झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते.यावेळी 420 पुरुष (गाेव्यातील एका प्रशिक्षणार्थीसह) व 163 महिला असे एकूण 583 प्रशिक्षणार्थ्यांनी 12 महिने कालावधीचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पाेलीस दलात दाखल झाले. अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी पाेलीस दलात दाखल हाेणाऱ्या अधिकाऱ्यांना पद व गाेपनीयतेची शपथ दिली. यावेळी पाेलीस आयु्नत संदीप कर्णिक, विशेष पाेलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पाेलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी उपस्थित हाेते.
‘गडचिराेलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पाेलिसांनी माेठे यश मिळवले आहे. आता तेथील नागरिकांच्या मनात सुरक्षेबराेबरच सेवेची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणावयाचे आहे. गुन्हेगारीचे स्वरूप दवसेंदिवस बदलत आहे. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या आव्हांनाना सामाेरे जाण्यासाठी पाेलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम हाेणे गरजेचे आहे,’ असे दाते यांनी सांगितले. दीक्षान्त साेहळ्यासाठी सहसंचालक नंदकुमार ठाकूर, उपसंचालक प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण) गीता चव्हाण, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) महेश चिमटे, उपसंचालक (आयटी व सुरक्षा) पद्मजा चव्हाण-बढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.