शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार

    11-Jun-2026
Total Views |
 
 

jawan 
महाराष्ट्रातील अकाेला जिल्ह्यातील माेरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांनी काश्मीर खाेऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखवलेले अद्वितीय शाैर्य आणि सर्वाेच्च बलिदानाबद्दल मरणाेत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष रक्षा अलंकरण साेहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या साेहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह; तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित हाेते.काश्मीर खाेऱ्यात 6 जुलै 2024 राेजी सुरू असलेल्या शाेध माेहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ कार्यरत हाेते.
 
माेहिमेदरम्यान काही संशयास्पद हालचाली निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने बेछूट गाेळीबार केला. प्रतिकूल परिस्थितीतही जंजाळ यांनी विलक्षण धैर्य, शाैर्य आणि प्रसंगावधान दाखवत दहशतवाद्यांचा पाठलाग केला. अचूक गाेळीबारातून त्यांनी दाेन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीदरम्यान त्यांच्या डाेक्याला गाेळी लागून ते गंभीर जखमी झाले हाेते.मात्र, गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवला आणि अखेर मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करले. त्यांचे हे अतुलनीय शाैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेसाठीच्या सर्वाेच्च बलिदानाचा गाैरव म्हणून केंद्राने त्यांना मरणाेत्तर कीर्ती चक्र जाहीर केले हाेते.