श्री गणेशाला विद्या, कला आणि गुणांचा दाता मानले जाते. काेणत्याही कार्याचा शुभारंभ गणेशाच्या प्रार्थनेने करण्याची आपली परंपरा आहे. त्याला ओंकारस्वरूप मानतात आणि ओंकार म्हणजे वेदारंभी झालेला आदिम आणि अनाहत परमेश्वरी नाद आहे. त्या नादाचे गजानन हे साक्षात स्वरूप मानले जाते. त्याच्या स्मरणाने कार्यकर्त्याला बळ प्राप्त हाेते आणि त्याच्या कृपेने इच्छित कार्यामध्ये येणाऱ्या सर्व विघ्नांचा नाश हाेऊन कार्य सिद्धीस जाते अशी सनातन धारणा आहे. श्री गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणूनच गणेशाचे वर्णन - त्वमेय केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि असे केलेले आहे. काेणत्याही लेखनाची सुरुवात करताना आपण जाे ‘श्री’ कार काढताे, ताेही गणेशस्वरूपच आहे.
त्यामुळे सर्व संत परंपरेप्रमाणे समर्थ रामदासही या ‘गणेशस्तवन’ नामक दुसऱ्या समासात गणपतीचे स्तवन करून त्याला या ग्रंथसिद्धीसाठी आवाहन करीत आहेत. हे ओंकारस्वरूप असणाऱ्या, गणांचा अधिपती असणाऱ्या आणि सर्व सिद्धीचे फळ देणाऱ्या, अज्ञान आणि भ्रांती यांचा समूळ नाश करणाऱ्या आणि स्वत:च प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप असणाऱ्या गजानना, तुला माझे वंदन असाे, असे म्हणून श्रीसमर्थ या समासाचा प्रारंभ करतात आणि त्याला या सर्व लेखनामध्ये माझ्यावर कृपा कर असेही विनवतात. ‘माझिया अंतरी भरावे’ असे म्हणताना समर्थ पुढे गणेशाने सर्व काळ तेथे म्हणजे अंत:करणात वास्तव्य करावे आणि त्या त्याच्या वास्तव्याने माझ्या सारख्या ‘वाग्सुन्यांस’ म्हणजे साहित्य किंवा वाययाच्या बाबतीत शून्यरूप असणाऱ्याकडून चांगला ग्रंथ लिहवून घ्यावा असेही म्हणतात.