
राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर 150व्या तुकडीतील 353 छात्रांचे नेत्रदीपक संचलन आणि सुखाेई विमानांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांद्वारे प्रबाेधिनीचा दीक्षान्त संचलन साेहळा उत्साहात पार पडला.लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. या संचलनानंतर छात्रांनी जल्लाेष केला. खेत्रपाल मैदानावर सकाळी झालेल्या या समारंभास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा यांच्यासह आजी-माजी लष्करी अधिकारी, छात्रांचे पालक व अन्य मान्यवर उपस्थित हाेते. या दीडशेव्या तुकडीतील 353 छात्रांनी एनडीएचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. यात 18 महिला छात्र; तसेच बारा मित्रदेशांतील 24 छात्रांचा समावेश हाेता. कॅप्टन मयांक चाैधरीने दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व केले.जनरल द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केलेले हे छात्र आता लष्करी सेवेत दाखल हाेतील. या संचलनानंतर सुखाेई विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्याला उपस्थितांनी माेठी दाद दिली. या अभ्यासक्रमात गुणानुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आलेल्या छात्रांना जनरल द्विवेदी यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गाैरवण्यात आले.