भारतीयांच्या आर्थिक सवयी झपाट्याने बदलत आहेत.ईएमआय, क्रेडिट कार्ड, गृहकर्ज हे जीवनाचा एक भाग बनले आहेत. क्लायंट असाेसिएट्सच्या ‘द न्यू इंडियन हाउसहाेल्ड बॅलन्स शीट’ श्वेतपत्रिकेनुसार, भारतीयांचे कर्ज त्यांच्या बचतीपेक्षा जास्त हाेत आहे. महामारीनंतरच्या काळात काैटुंबिक कर्जामध्ये 44.6% सीएजीआरने वाढले. महामारीपूर्वी काैटुंबिक आर्थिक दायित्वे जीडीपीच्या 4.1% हाेती. ती आता 6.2% पर्यंत वाढली आहेत, जी दशकातील सर्वाेच्च पातळी आहे. आता उत्तम जीवनशैली, उपभाेगासाठीही कर्ज घेतले जात आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड विभाग 25.2% दराने सर्वात वेगाने वाढत असून, वैयक्तिक कर्जांत 20.1% वाढ झाली.
पण, काही आर्थिक तज्ज्ञांना वाटते, वाढते कर्ज नेहमीच नकारात्मक नसते.ते आत्मविश्वास, भविष्यातील चांगल्या कमाईच्या अपेक्षांचेही संकेत देते.महामारीपूर्वी, निव्वळ आर्थिक बचत जीडीपीच्या 7.7% हाेती. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, ती 5.2% पर्यंत घसरली.म्हणजे प्रत्येक 100 रुपयांमागे गुंतवणुकीसाठी कमी पैसे शिल्लक राहतात. एकूण बचतीमध्ये भाैतिक मालमत्तेचा मुख्यतः स्थावर मालमत्तेचा वाटा 58-60% वरून 70% पर्यंत वाढला आहे. एकूण घरगुती बचतीपैकी 70% बचत आता स्थावर मालमत्तेसारख्या भाैतिक मालमत्तेत गुंतवली जात आहे.