अधिक महिन्यात जावयाला धाेंडे जेवण करण्याची प्रथा आहे.जावयाला अधिक महिन्यात साेन्याची अंगठी देण्याची प्रथा आहे. मात्र साेन्याचे वाढलेले भाव आणि धाेंड्याचा महिना सुरू हाेण्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वर्षभर साेनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने यंदा जावयांना साेन्यापेक्षा इतर भेटवस्तू देण्याकडे अधिक कल दिसत आहे.अर्थात काही हाैशी सासू-सासरे अगदी पाेटाला चिमटा काढूनही साेन्याचा छाेटा का असेना दागिना देतात. मात्र धाराशिवमधील जावयाला सासरवाडीकडून चक्क घाेडी भेट दिली आहे. ही घाेडी भेट देण्यामागील कारणही तसं खास आहे.अधिक महिन्यामध्ये जावयाला साेन्याची अंगठी दिली जाते. मात्र आता साेनं परवडत नसल्याने तसेच मागील दीड आठवड्यांपासून सातत्याने पेट्राेल-डिझेलचे दर वाढत असल्याने बाईक किंवा कार देण्यातही काही अर्थ नाही असा विचार करुन धाराशिव मधील जावयला सासऱ्याकडून चक्क घाेडी भेट मिळाली आहे.
इंधन आणि एकंदरीतच वाढती महागाई लक्षात घेता भूम तालुक्यातील ईट येथील क्रांतिसिंह राऊत यांना ही घाेडी भेट देण्यात आली आहे. क्रांतिसिंह राऊत यांचे सासरे विलास झांबरे यांनी ही घाेडी भेट दिली आहे.धाेंडे जेवणाची भेट म्हणून विलास झांबरे यांनी जावयाला सिंधी जातीची घाेडी दिली आहे. काेणतीच कल्पना न देताना विलास झांबरे यांनी जावयाला शेतात उपयाेगी पडणारं अनाेखं गिफ्ट दिलं आहे, असं सांगितलं. धाेंडे जेवणानिमित्त ही भेट स्वीकारा असे विलास झांबरे यांनी जावयांना सांगितले. ज्या वेळी प्रत्यक्षात क्रांतिसिंह राऊत यांनी घराबाहेर येऊन पाहिलं त्या वेळेस घरासमाेर सुंदर सिंधी जातीची घाेडी पाहून आश्चर्यचकित झाले.
साेन्याचा वाढलेला भाव आणि इंधनाची महागाई यावर उपाय म्हणून मला ही घाेडी भेट देण्यात आली आहे. याबद्दल आम्हाला काेणतीही पूर्वकल्पना नव्हती. मला सासऱ्यांचा फाेन आला आणि शेती उपयाेगी वस्तू पाठवल्याचं सांगितलं.मात्र प्रत्यक्षात घाेडी पाहून आश्चर्याचा धक्काच बसला, असं क्रांतिसिंह राऊत यांनी सांगितलं. सिंधी जातीची ही घाेडी 18 महिन्यांची आहे. या घाेडीचं वैशिष्ट्य म्हणजे घाेडीवरुन प्रवास करताना एखादी व्यक्ती पडली तरी ती घाेडी पुढे पळून न जाता आहे त्या जागीच थांबते अशी माहिती क्रांतिसिंह राऊत यांनी दिली.पेट्राेल डिझेलच्या वाढत्या महागाईवरून आणि साेन्याच्या वाढत्या बाजारभावावरून सासऱ्याने जावयासाठी लढवलेली ही अनाेखी शक्कल सध्या संपूर्ण पंचक्राेशीत चर्चेचा विषय ठरत आहे.