लष्कराच्या तिन्ही दलांत समन्वय राखण्यासाठी राबवण्यात येत असलेली थिएटरायझेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दाेन-तीन वर्षांत सैन्यात ‘थिएटर कमांड’ अस्तित्वात येताना दिसेल, असा विश्वास लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी येथे व्य्नत केला.राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए) दीक्षान्त संचलनानंतर जनरल द्विवेदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा या वेळी उपस्थित हाेते.थिएटरायझेशनच्या प्रक्रियेविषयी बाेलताना जनरल द्विवेदी म्हणाले, की याबाबतच्या सर्व चर्चा चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीमध्ये पूर्ण झाल्या असून, त्याचा अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. सध्या विविध पातळ्यांवर त्याचा आढावा घेण्यात येत आहे.
तिन्ही दलांमध्ये समन्वय साधताना संबंधित अधिकाऱ्यांना तडजाेडीची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सैन्यउभारणी, प्रशिक्षण आणि देखभाल जबाबदारी सैन्यप्रमुखांकडे, तर माेहिमेवेळी तिन्ही दलांमधील समन्वयाची, प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी थिएटर कमांडरवर असेल, अशी रचना नव्याने करण्यात येत आहे.देशाच्या नवीन लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वात येत्या दाेन ते तीन वर्षांत ही व्यवस्था प्रत्यक्षात पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रत्येक जवानाच्या हातात ड्राेन म्हणजेच ईगल ऑन द आर्मसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता बदलत्या युद्धकाळात प्रत्येक जवानाला ड्राेन हाताळण्यासह ड्राेन प्रतिराेधक तंत्राचे काैशल्यही आत्मसात करण्याची गरज आहे. आता एनडीएच्या अभ्यासक्रमातूनही ड्राेन वापराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी अकादमीत ड्राेन, सिम्युलेटर आणि आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.