खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात अंदाज बांधता येत नसताे, ते क्षण राेमांचकच; पण तणाव वाढवणारेही असतात. म्हणूनच शेवटपर्यंत अनिश्चितता राहते. असा सामना पाहताना अनेकांचा रक्तदाब वाढताे, काहींना हार्ट अॅटॅकही येताे. आपल्या संघाचा पराभव आधीच निश्चित झाला असेल तर वाईट वाटते, पण तेव्हा तणावाचे दुष्परिणाम फार हाेत नाहीत.दुःखद घटनेपेक्षाही अनिश्चिततेचा तणाव अधिक त्रासदायक असताे. वाहतूक काेंडीमुळे मीटिंगला वेळेवर पाेहाेचू शकत नाही हे निश्चित हाेते, त्या वेळी पुढील परिस्थिती कशी हाताळायची याची याेजना माणूस करू लागताे. मात्र, वेळेवर पाेहाेचू की थाेडासा उशीर हाेईल, अशी धाकधूक मनात असते. अशा वेळी काेणताच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अस्वस्थता अधिक राहते. मेंदू संशाेधनात याचे कारण समजले आहे.काेणतीही निश्चिती हाेते, मग ती दु:ख देणारी असली, तरी मेंदूची उत्तेजित अवस्था कमी हाेते. अनिश्चिती असते त्या वेळी मात्र ताे अधिक उत्तेजित अवस्थेत राहताे.
काही काळ ही उत्तेजित अवस्था हवीहवीशी वाटते, त्यामुळेच काेणत्याही एकतर्फी सामन्यापेक्षा चुरशीचा सामना अधिक मनाेरंजक असताे. त्यातील काेणत्याच संघात आपण अधिक गुंतलेलाे नसू, तर खेळाचा आनंद अधिक मिळताे. यावरून असे स्पष्ट हाेते की, ज्या वेळी आपण साक्षी असताे, काेणत्याही एका बाजूला अधिक गुंतलेलाे नसताे, त्या वेळी अनिश्चिततेचा आनंद अनुभवू शकताे.त्यामुळे आपले आयुष्य हेदेखील एक खेळ मानला आणि स्वत:च्या शरीर-मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहू शकलाे, तर आयुष्यात येणाऱ्या अनिश्चिततेचाही तणाव कमी हाेताे, उत्सुकतेचा आनंद अनुभवता येताे. हे लिहिणे साेपे असले, प्रत्यक्षात आणणे कठीण असले, तरी राेज काही वेळ स्वत:च्या शरीर-मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहण्याचा सराव-म्हणजेच साक्षीध्यान-केल्याने हे शक्य हाेते. मनात मी/ माझा असा विचार असताे, त्या वेळी मेंदूतील पाेस्टेरिअर सिंग्युलेट काॅर्टेक्स आणि अमीग्डला हे भाग अधिक उत्तेजित असतात. माणूस साक्षीभावाने शरीरातील संवेदना आणि भावना यांचा स्वीकार करताे, त्या वेळी हा भाग शांत हाेताे. त्यामुळे तणाव कमी हाेताे.