राशिचक्र दागिन्यांची युवांमध्ये क्रेझ

    07-May-2026
Total Views |
 
 


rashi
 
तुमची सूर्य रास काेणती आहे? आणि चंद्र रास...? आजच्या पिढीसाठी म्हणजेच जेन-झीसाठी, हे केवळ संभाषणाची सुरुवात करण्याचे साेपे प्रश्न नाहीत. त्यांच्यासाठी, तुमची रास तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात माेठा स्राेत बनली आहे. साेशल मीडियाच्या बायाेपासून ते पेंडंटपर्यंत, नक्षत्रांची हालचाल ही फॅशनची नवी भाषा बनली आहे.डिजिटल संस्कृतीचे तज्ज्ञ लाॅरेंट फ्रेंकाेइस यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी आपली ओळख व्यक्त करण्यासाठी ज्याेतिषशास्त्राकडे वळत आहे. साेशल मीडियावर या समुदायासंबंधी 60 लाखांहून अधिक व्हिडिओ हे सिद्ध करतात की, आध्यात्मिक आणि गूढ विषय आता कालबाह्य राहिलेले नाहीत.
उलट ते तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
 
दागिन्यांच्या बाजारपेठेतही ज्याेतिषाचा विषय डिजिटल जगाचा हा ट्रेंड आता खऱ्या जगात, म्हणजेच दागिन्यांच्या बाजारपेठेत, धुमाकूळ घालत आहे. पॅरिसमधील प्रसिद्ध दागिन्यांचे दुकान ‘व्हॅन क्लीफ अँड अपॅरल्स’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. हा ब्रँड त्याच्या चार-पानांच्या क्लाेव्हर डिझाइनसाठी ओळखला जाताे. तरी, त्याच्या ‘जाेडिएक कले्नशन’ ने (राशिचक्र दागिने) तरुणांना माेहित केले आहे. हा ब्रँड 1950 च्या दशकापासून राशिचक्राचे पेंडंट बनवत आहे, परंतु 2026 मध्ये, त्यांनी ते एका नवीन आणि परवडणाऱ्या किमतीत पुन्हा सादर केले. या काेरलेल्या पेंडंटची किंमत पूर्वी 18-20 लाख रुपये हाेती.परंतु आता नवीन डिझाइनची किंमत 2 लाख रुपयांपासून सुरू हाेते, ज्यामुळे ते तरुण पिढीसाठी अधिक आकर्षक बनले आहेत.
 
राशिचक्राचे दागिने बनले स्टाईल स्टेटमेंट ‘मिलमाेर’ या फॅशन ब्रँडचे संस्थापक जाॅर्ज इनाकी यांनी सांगितले की, ‘‘जेव्हा मी अमेरिकेत आलाे, तेव्हा लाेक म्हणायचे, तुम्ही तूळ राशीचे आहात, त्यामुळे तुम्ही संतुलित आहात. या अनुभवाने मला राशिचक्राचे दागिने तयार करण्याची प्रेरणा दिली.लाेकांना ज्याेतिषशास्त्राबद्दल अधिकाधिक आकर्षण वाटत आहे.’’ पुरातन दागिन्यांच्या विक्रेती क्रिस्टीन चेंग यांनी सांगितले की, प्रत्येकाचे स्वतःचे काैटुंबिक चिन्ह नसले, तरी ते वाढदिवस आणि राशीनुसार व्यक्तिमत्त्व दर्शवण्यासाठी चिन्हे घालणे पसंत करतात. मग ते चिनी राशिचक्रातील ‘सर्प’ असाे किंवा 2026 सालचा ‘अग्नि अश्व’ असाे... या नक्षत्राचे महत्त्व आता केवळ भविष्य सांगण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते एक स्टाईल स्टेटमेंट बनले आहे.
 
भारतात राशींच्या रत्नांशी घनिष्ठ संबंध पाश्चात्त्य देशांमध्ये राशीचिन्हे केवळ प्रतीके आहेत, परंतु भारत आणि मध्य पूर्वेत ती संस्कृतीचा एक भाग आहेत. प्रसिद्ध भारतीय डिझायनर सव्यसाची यांच्या हाय ज्वेलरी कलेक्शनमधील आर्या रिंग हे याचे उत्तम उदाहरण आहे. 18 कॅरेट साेने आणि हिऱ्यांपासून बनवलेली ही अंगठी नवरत्नांपासून प्रेरित आहे. जी वैदिक ज्याेतिषशास्त्रातील नऊ रत्नांच्या शक्तीचे प्रतीक आहे.लंडन येथील ज्वेलरी डिझायनर करीना चाैधरी यांनीही या अंगठीला एक अनाेखा अर्थ दिला आहे. त्यांच्या ‘मेसेज इन अ बाॅटल नेकलेस’मध्ये माणिक किंवा हिरे अशा प्रकारे जडवलेले आहेत, की ते खडे नेहमी त्वचेला स्पर्श करतात आणि परिधान करणाऱ्याला त्यांची ऊर्जा देतात.