मागील समासात परब्रह्मापासून खालच्या दिशेने येऊन जीवसृष्टीपर्यंत पाेचणारा क्रम सांगितल्यावर या समासात ताे विचार पुन्हा उलट करून परत माघारी िफरवून स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा मार्ग श्रीसमर्थ विवरण करून सांगत आहेत. चारीही खाणींम धील जीव शेवटी पृथ्वीमध्येच नाश पावतात. हे जीव आणि पृथ्वी विचाररूपी वृक्षाच्या शेंड्याकडील भाग आहे. तेथून खाली पंचमहाभूते, त्यानंतर मुळाप्रमाणे असलेले त्रिगुण व मूळमाया व त्याही खाली बीजरूपाचे ब्रह्मस्वरूप असे उलट बीजाकडे यावे. सूक्ष्मदृष्टीने हे सूक्ष्मतम परब्रह्म ओळखावे. मूळमायेला सत्त्व, रज, तम, गुणक्षाेभिणी, शुद्धसत्त्व, शिवशक्ती, प्रकृतीपुरुष, षड्गुणैश्वर, अर्धनारीनटेश्वर, गुणसाम्य, चैतन्य, मन, माया आणि अंतरात्मा अशा चाैदा संकेतांनी ओळखले जाते. त्यात पाच महाभूते आणि चार खाणी असे मिळविले म्हणजे एकूण तेवीस तत्त्वे हाेतात.
श्रीसमर्थ म्हणतात - चाैदा पाच येकाेणीस । येकाेणीस च्यारी तेवीस । यामधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावे ।।15।। अशा तेवीस तत्त्वांमध्ये चाैदा मूळ तत्त्वे म्हणजे मूळमायेचे चाैदा संकेत मुख्य आहेत. त्यांचा परत परत अभ्यास करावा म्हणजे सृष्टीचे बीज मूळमायेतच आहे हे लक्षात येईल आणि साधकाची परमार्थाला सिद्धता हाेईल. ब्रह्मापासून ब्रह्मांडापर्यंत खालच्या दिशेने प्रवास करताना भेद व भ्रम वाढताे पण ताेच उर्ध्वमुख म्हणजे सृष्टीपासून परब्रह्माकडे विचारप्रवास केला की भ्रम संपून ज्ञान प्राप्त हाेते. त्या ज्ञानातूनच पुढे विवेकाने मूळ परब्रह्माशी एकरूपता येऊन ज्ञानाचे विज्ञान हाेते व साधक नि:संग, विरागी असा महायाेगी बनू शकताे.
ज्याला हे ब्रह्मज्ञान झाले नाही पण कमीत कमी त्याचे अस्तित्व व सत्यत्व समजले त्याने मग मायेच्या मायावीपणात, दृश्याच्या माेहात न सापडता सत्य ज्ञानाचा मार्ग निष्ठेने धरला पाहिजे.