नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी ‘जीवन वाहिनी’ ठरणाऱ्या बहुचर्चित नारपार-गिरणा नदीजाेड प्रकल्पाचे काम सुरू हाेण्याचा मार्ग आता पूर्णपणे माेकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 4116.10 काेटींच्या निविदा प्रक्रियेला शासन स्तरावरील समितीने अंतिम मान्यता दिली आहे. निविदा मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लवकरच हे काम प्रत्यक्ष सुरू हाेईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, माेसम, बाेरी आणि कान्हाेळी नदी खाेरे परिसर वर्षानुवर्षे दुष्काळी पट्ट्यात माेडताे. या भागाची पाण्याची तहान भागवण्यासाठी पश्चिम वाहिनी नारपारऔरंगा नद्यांचे गुजरातमध्ये अरबी समुद्रात वाहून जाणारपाणी गिरणा उपखाेऱ्यात वळवण्याची मागणी अनेक वर्षांपासून हाेत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर 5 सप्टेंबर 2024 राेजी 7465.29 काेटी खर्चाच्या या प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.
या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरातील सुमारे 81230 एकर, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व एरंडाेल तालुक्यातील 42560 एकर जमीन सिंचनाखाली येईल. अशा प्रकारे दाेन्ही जिल्ह्यांतील एकूण 1 लाख 23 हजार 790 एकर क्षेत्राला हक्काचे पाणी उपलब्ध हाेणार आहे. शेतीसह पिण्याचा आणि उद्याेगांचाही पाणीप्रश्न सुटणार आहे.हा प्रकल्प दाेन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून सुमारे 10.64 टीएमसी पाणी उपलब्ध हाेणार आहे. त्यासाठी 4116.10 काेटींची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेला राज्य शासनाच्या समितीने अंतिम मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येतील. लवकरच या प्रकल्पाचा भूमिपूजन साेहळा आयाेजित केला जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.