बऱ्याच वेळा असे घडते की आपण बऱ्याच वेळपर्यंत बसून किंवा झाेपून राहिलेले असताे आणि त्यानंतर जेव्हा अचानक उठताे, तेव्हा किंचित चक्कर येते. काही क्षणांसाठी आजूबाजूचे सगळे फिरत असल्यासारखे वाटते आणि नंतर काही सेकंदात सर्व काही सामान्य हाेते. बहुतेक लाेक अशा समस्येकडे दुर्लक्ष करतात, कारण असे का हाेते याची त्यांना माहिती नसते. वास्तविक पाहता, अशा प्रकारे चक्कर येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत ऑर्थाेस्टॅटिक हायपाेटेंशन म्हटले जाते.तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण जास्त वेळ बसल्यानंतर किंवा झाेपल्यानंतर अचानक उभे राहताे, तेव्हा आपले ब्लड प्रेशर (रक्तदाब) काही क्षणांसाठी कमी हाेते.
असे हाेण्यामागचे कारण म्हणजे, अचानक उभे राहिल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने पायांच्या दिशेने जाते.आपल्या शरीराला ही नवीन स्थिती हाताळण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागताे आणि त्याच दरम्यान आपल्याला किंचित चक्कर येणे, डाेके फिरणे किंवा डाेळ्यांसमाेर अंधारी येणे असा अनुभव येताे.एका संशाेधनानुसार, वयाची 65 वर्षे ओलांडलेल्या सुमारे 20 टक्कवृद्धांना कधी ना कधी असा अनुभव येताे. वाढत्या वयासाेबत शरीराची प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते, ज्यामुळे ब्लड प्रेशरमधील हा अचानक हाेणारा चढ-उतार सांभाळणे शरीराला थाेडे कठीण जाते. तसे पाहता, जर ही समस्या कधीतरीच उद्भवत असेल आणि काही क्षणांत सर्व काही सामान्य हाेत असेल, तर जास्त काळजी करण्याची गरज नाही.
या समस्येपासून कसं वाचाल? डाॅक्टरांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले :
औषधांची तपासणी करा : सर्वात आधी हे जाणून घ्या की, जर तुम्ही नियमितपणे एखादे औषध घेत असाल, तर ही चक्कर त्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे (साईड इफेक्ट्स) तर येत नाहीये ना? डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः हून काेणतीही औषधे बंद करण्याची चूक करू नका, ते अधिक जाेखमीचे ठरू शकते.
भरपूर पाणी प्या : आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते. कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) हाेते, ज्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे दिवसभरात पाणी पिणे फायदेशीर ठरते.
अचानक उठणे टाळा : झाेपेतून उठल्यानंतर किंवा जास्त वेळ बसून राहिल्यानंतर लगेचच उभे राहू नका. उभे राहण्यापूर्वी काही सेकंद तिथेच बसा आणि हात-पाय थाेडे हलवा. त्यानंतर हळूहळू उठून उभे राहा. पायाचे स्नायू थाेडे स्ट्रेच करा. आधी काही पावले हळू चाला.
जेवणानंतर चक्कर येत असल्यास : काही लाेकांना जेवण केल्यानंतर चक्कर येते. वास्तविक, आपण जेव्हा काही खाताे, तेव्हा ते अन्न पचवण्यासाठी रक्ताचा प्रवाह पाेटाच्या दिशेने वळताे. जर तुम्हाला जेवल्यानंतर चक्कर येत असेल, तर दिवसातून दाेन-तीन वेळा पाेटभर खाण्याऐवजी, चार ते पाच वेळा थाेडे-थाेडे खाण्याची सवय लावा.