केंद्रीय निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखाेल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) माेहीम राबवण्यात येणार असून, राज्यातील सुमारे 9 काेटी 68 लाख मतदारांच्या नाेंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चाेक्कलिंगम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही माेहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेत सह मुख्य निवडणूक अधिकारी मनाेहर पारकर उपस्थित हाेते. या माेहिमेंतर्गत 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित फाॅर्मद्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत.
नाव, पत्ता, फाेटाे किंवा इतर तपशिलांमध्ये बदल असल्यास त्याची नाेंद करता येणार आहे. तसेच, अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट (एएसडीडी) प्रकारातील नाेंदींची तपासणीही केली जाणार आहे. 2002 ते 2004 मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. माेहिमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नाेंदवता येणार आहेत.3 ऑक्टाेबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. 7 ऑक्टाेबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती चाेक्कलिंगम यांनी दिली.