राज्यातील प्रवाशांसाेबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकवण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, 16 ऑगस्टनंतर काेणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरनाईक बाेलत हाेते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त रवी गायकवाड, संदेश चव्हाण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डाॅ. ना.काें. भाेसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकडाॅ. श्यामकांत देवरे, प्रा.सुहासिनी कीर्तिकर, डाॅ. ज्याेती ठाकरे, डाॅ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. डाॅ. प्रदीप ढवण, अरुण म्हात्रे, मीनाक्षी जयकर, स्वाती गावडे, शिवाजी गावडे, दीपा ठाणेकर, माेहन पाटील आदी उपस्थित हाेते.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांत जाऊन मराठी शिकून घ्यावी.या प्रशिक्षणात सुमारे चार हजार शिक्षक सहभागी हाेणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्यासाेयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून, काहींना प्रतितास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.रिक्षा-टॅक्सी चालकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठीवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये ताेंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.