राज्यातील ‘लाईव्ह इव्हेंट’ क्षेत्राला चालना देण्यासाठी एक खिडकी याेजनेच्या माध्यमातून सर्व परवानग्या मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास नाेडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. लाईव्ह इव्हेंट संदर्भातील सर्व परवानग्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या एसओपीसाठी (सर्वसमावेशक विशिष्ट कार्यपद्धती) संबंधित विभागांनी सूचना द्याव्यात, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.याबाबत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीत सिंह बाेलत हाेते. महाआयटी आयुक्त भुवनेश्वरी बी, अपर पाेलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगाेळकर, पाेलिस उपायुक्त अकबर पठाण आदी यावेळी उपस्थित हाेते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) किशाेर गांगुर्डे यांनी एसओपीची माहिती दिली.लाईव्ह इव्हेंट, कन्सर्ट आदी कार्यक्रमांच्या परवानग्यांचे समन्वयन आणि इतर अनुषंगिक बाबीच्या नियाेजनासाठी केंद्राच्या माॅडेल लाईव्ह इव्हेंट क्लिअरन्स प्रमाणित कार्यपद्धतीनुसार राज्यासाठी एक प्रभावी व उद्याेग पूरक कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लाईव्ह इव्हेंट्स आयाेजिण्याची प्रक्रिया सुलभ, गतिमान हाेऊन लाईव्ह इव्हेंट्स उद्याेग क्षेत्राला माेठी चालना मिळेल.तसेच, पर्यटन, गुंतवणूक विकासासह राेजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला. यावेळी पाेलिस, मंबई महापालिका, अग्निशमन सेवा, बेस्ट, ग्रामविकास, राज्य पुरातत्त्व, आयटी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी एसओपीबाबत सूचना केल्या.