
किल्ले रायगडावर हाेणाऱ्या शिवराज्याभिषेक साेहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने 30 व 31 मे राेजी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.यावर्षी शिवराज्याभिषेक साेहळा तारखेनुसार 6 जून, तर तिथीनुसार 26 जूनला साजरा हाेणार आहे. रायगडावर दरवर्षी तारीख आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साेहळा उत्साहात साजरा केला जाताे. यासाठी राज्यभरातून लाखाे शिवभक्त गडावर दाखल हाेतात, अशा वेळी पायरी मार्गाने येणाऱ्या पर्यटकांच्या आणि शिवभक्तांच्या जीवाला धाेका हाेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून गडावरील सैल झालेले दगड काढले जातात. गडाचा पायरी मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवला जाताे. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनाची कामे केली जातात. मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांच्या माहितीनुसार, यंदाच्या साेहळ्यापूर्वी धाेकादायक व सैल दगड हटवण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. ही माेहीम 30 व 31 मे राेजी राबवण्यात येणार आहे. नागरिकांना धाेका निर्माण हाेऊ नये म्हणून पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.