राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात साठवणूक क्षमता वाढवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गालगत, तसेच इतर ठिकाणी अॅग्राे लाॅजिस्टिक पार्क उभारण्यात येत असून, शेतकरी-केंद्रित डिजिटल साठवणूक व्यवस्था निर्माण करण्याला वेग देण्यात येत आहे. तसेच, शेतकऱ्यांनी गाेदामात साठवणूक केलेल्या शेतमालावर ब्लाॅकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गाेदाम पावतीनुसार ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. असे जलद तारण कर्ज उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
वखार महामंडळाच्या आढावा बैठकीत रावल बाेलत हाेते. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अभय महाजन, वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक काैस्तुभ दिवेगावकर, तसेच पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, पणन संचालक शरद जरे उपस्थित हाेते.
ब्लाॅकचेन शेतमाल तारण कर्ज याेजनेंतर्गत आतापर्यंत 8131 शेतकरी आणि 442 शेतकरी उत्पादक संस्थांना एकूण 214.58 काेटींचे कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती रावल यांनी दिली. या याेजनेमुळे शेतकऱ्यांना बँकेच्या फेऱ्या न मारता डिजिटल पद्धतीने शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले. गाेदाम क्षमतेचा विस्तार, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ व तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित अॅग्राे लाॅजिस्टिक पार्क, विविध महामंडळांच्या मालमत्तांचा अधिक कार्यक्षम वापर, तसेच सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.