राज्यातील माॅन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे साैम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्राेल सिस्टीम’ विकसित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली माॅन्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पाेलिस महासंचालक सदानंद दाते, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, विभागीय आयुक्त व अधिकारी उपस्थित हाेते.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डाॅ. भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केले.असर्व विभागीय आयुक्तांनी जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सादर केला. लष्कर, नाैदल, हवाई दल, तटरक्षक दल, तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी समन्वय वाढवण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नाैदलाच्या पश्चिम कमांडने माेठी व लहान जहाजे, हेलिकाॅप्टर व इंटरसेप्टर क्राफ्ट उपलब्ध ठेवले आहेत, तर हवाई दलाच्या एअर म्ब्युलन्स आणि एअर कार्गाे सुविधा सज्ज आहेत. राज्यात एसडीआरएफच्या 10 टीम कार्यरत असून, आणखी दाेन टीमना मान्यता देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.