कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये विविध कामे हाेत आहेत. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनाला प्राधान्य देत पुरातत्त्व विभागाने काम सुरू केले आहे. यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने 55 काेटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून 16 महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे.मंदिरांचे शहर अशी नाशिक व त्र्यंबकेश्वरची ओळख आहे. गाेदाकाठावर 30 पेक्षा अधिक मंदिरे आहेत.याशिवाय त्र्यंबकेश्वर परिसरात मुख्य देवस्थान वगळता अन्य मंदिरे आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांमध्ये कुंभमेळ्यात गर्दी हाेणार आहे. बदलत्या वातावरणाचा या पुरातन वास्तूंवर परिणाम हाेत असून, काही ठिकाणी मूर्तींची झीज, मंदिराची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पर्वणी काळात काेणताही अनर्थ हाेऊ नये, यासाठी पुरातत्त्व विभाग संवर्धनाला प्राधान्य देत आहे.
या प्राचीन वास्तूंचे मूळ स्थापत्य वैभव टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. रामकुंड परिसरातील मूळ शहरी रचना अबाधित ठेवत नियाेजन करण्यात येत आहे. राेज येणारे भाविक, तसेच कुंभमेळ्यात हाेणारी गर्दी या अनुषंगाने मंदिरांची दुरुस्ती केली जात आहे. सध्या राज्य शासनाकडून 55 काेटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यात नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील 16 कामे करण्यात येणार आहेत. त्यात गाेदाकाठावरील प्राचीन मंदिरे, त्र्यंबकेश्वरमधील ऐतिहासिक कुंड आणि तीर्थस्थळांचा समावेश आहे.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरातील 16 प्रकल्पांसाठी 55.72 काेटींचा निधी प्राप्त झाला असून, नाशिकमधील सहा, तसेच त्र्यंबकेश्वर मधील 10 प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. संवर्धनात काही तांत्रिक अडचणी असल्याने काम पूर्ण हाेण्यात थाेडा वेळ लागू शकताे, परंतु, वेळेत कामे हाेण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे पुरातत्त्व विभागाचे संचालक अमाेल गुटे यांनी सांगितले.