बाळ राॅक्स, आई शाॅक्ड

    14-May-2026
Total Views |
 
 

moom 
 
काही काळापूर्वी जुन्या काळातल्या चित्रातल्या व्यक्तिरेखांच्या ताेंडी आजच्या काळातले विनाेदी संवाद देऊन गंमत करणारी ओल्ड आर्ट मीम्स लाेकप्रिय झाली हाेती. आता एआयला एक प्राॅम्प्ट दिला की आपल्याला हव्या त्या चित्रकाराच्या शैलीत आपल्याला हवी ती चित्रकृती आपण बनवून घेऊ शकताे. तिच्यात आपल्याला हवी ती रचना, हवं ते कथानक घुसवू शकताे.त्याचाच फायदा घेऊन बनवलेलं हे एआय चित्र असावं. पण, ही सिच्युएशन फार गंमतीशीर आहे. अगदी घराेघरी पाहायला मिळते ती. मातृदिनानिमित्त कुणीतरी साेशल मीडियावर शेअर केलेलं आहे हे. आई आणि बाळ यांच्यातला हा संवाद आहे. लहान बाळांना आईवडील काैतुकाने खेळणी आणतात, बाळाच्या वाढदिवसाला किंवा आणखी काही निमित्ताने भेटायला येणारे नातेवाइकही खेळणी आणतात. बाळाकडे भरपूर खेळणी जमा हाेतात. बरं त्यातली काही फाटली, जुनी झाली तरी बाळाला ती हवीच असतात, साेडायची नसतात. आई म्हणते, अरे बाबा, तुझ्याकडे फार वस्तू गाेळा झालेल्या आहेत (त्यातल्या काही काढून टाकायला हव्यात, असं ती सांगत असणार). त्यावर बाळाने दिलेलं उत्तर अफलातून आहे. एकतर त्याने रडण्याचं अस्त्र बाहेर काढलंय आणि ते म्हणतं, माझ्याकडे पैसे कुठे असतात? यातलं काहीही मी विकत घेतलेलं नाहीये. आई निरुत्तरच झाली असणार ना!