राज्यातील कारागृहांत विविध गुन्ह्यांत 26 हजारांवर कैदी शिक्षा भाेगत आहेत. त्याच कैद्यांच्या हाती कुदळ, फावडा यासारखी औजारे देऊन त्यांच्या हातून शेती फुलवली जात आहे. नाशिक राेड, येरवडा, पैठण, विसापूर अशा विविध 31 कारागृहांतील या कैद्यांनी 596 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले असून, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, साेयाबीनबराेबरच कांदा, मुळा, पालक, टाेमॅटाेचीही शेती या तुरुंगांत बहरली आहे. या कैद्यांनी वातावरणाच्या आव्हानांनाही ताेंड दिले असून, 2025- 26 मध्ये पावसाने केलेल्या नुकसानींनंतरही 5.46 काेटींचे उत्पादन शेतीतून मिळाले आहे.राज्यातील 31 कारागृंहांत शेती केली जाते. शेतीसाठी एकूण 596.59 हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, 330.88 हेक्टर क्षेत्रावर वांगी, काेबी, मिरची, फ्लाॅवर, कांदा, वाटाणा, पालक, टाेमॅटाे, बटाटा, मेथी, राजगिरा, मुळा यांसारख्या पिकांबराेबरच हरभरा, तूर यासारखी कडधान्ये, तसेच गहू, भात, ज्वारी, बाजरीसारखी धान्य पिके आणि भूईमूग, माेहरी, साेयाबीनसारखी गळीतधान्य पिकवली जातात.
उर्वरित 182.65 हेक्टरवर वनीकरण व फळपिकांची लागवड करण्यात आली आहे.शेतीबराेबरच कैद्यांकडून सामाजिकवनीकरणही केले जात आहे. 2025-26 मध्ये या कैद्यांच्या हातून 1 लाख 80 हजार 265 वृक्षांची लागवड करण्यात आली. पैठण खुल्या कारागृहात 158.77 हेक्टर क्षेत्र, येरवडा खुल्या कारागृहातील 103 हेक्टर, तर विसापूर खुल्या कारागृहातील 44.26 हेक्टर क्षेत्रात शेती केली जात आहे.तुरुंगांमध्ये जैविक शेतीला (सेंद्रिय) प्राधान्य देण्यात आले असून, अधिकाधिक भर जैविक खतांवरच दिला जात आहे. या पद्धतीमुळे रासायनिक खतांचा वापर 20 टक्क्यांखाली आला असून, 80 टक्के शेती जैविक आहे.यातून या कैद्यांनी अन्य शेतकऱ्यांसाठीही एक उदाहरण घालून दिले आहे.