
महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आराेग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव साेयम यांचा येथे गाैरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयाेजित साेहळ्यात, राष्ट्रपती दाैप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला साेयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल ‘राष्ट्रीय फ्लाेरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विशेष साेहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या साेहळ्यात केंद्रीय आराेग्यमंत्री जे. पी. नड्डा, आराेग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आराेग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित हाेत्या. चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला साेयम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आराेग्य क्षेत्रात समर्पित सेवा दिली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागात कन्याभ्रूण हत्या राेखण्यासाठी त्यांनी दिलेले याेगदान आणि आराेग्य जनजागृतीत घेतलेला पुढाकार गाैरवास्पद आहे.नैसर्गिक आपत्ती प्रवण क्षेत्र असाे किंवा कठीण भाैगाेलिक परिस्थिती, उच्च जाेखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे. या कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तिपत्र आणि 1 लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.